बाईला खूप वाटतं. किरण येले
बाईला खूप वाटतं
बाईला खूप वाटतं
व्हावं पुरुषासारखं
उन्मत्त, धसमुसळं
हात खेचून घ्यावा
त्याला ओठ ठेवून ओठांवर
जाळून टाकावं
जळून जावं आपण आरुढ
होत लाजेवर
दौडत क्षितिजापार
अनोळखी लयीत
अनामिक प्रदेशात
कुंवार
पण बाई
घाबरते त्याला
वाटेल निलाजरी
कशी ही एव्हढी
लाजरी-बुजरी तर
वाटत होती केव्हढी
म्हणून मग बाई
संयमित प्रतिसादात निपचिप
जे मिळेल जसंं मिळेल
गोड मानत राहते गपचिप
पाऊस आत धुंवाँधार मत्त
ती बाहेर पागोळयात फक्त
कितातरी बाया अशा
कधीच चिंब भिजत नाहीत आयुष्यभर
कधीच समभोग करीत नाहीत
करतो तो पु़रुष
आणि तोही
फक्त
सेक्स.
किरण येले
Comments
Post a Comment